जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील विद्या तीन स्तरावर कार्यरत असते. पहिला स्तर हा त्या विद्येच्या मुलभूत शास्त्रीय ज्ञानाचा असतो. दुसरा हा ज्ञानावर आधारित संशोधन आणि नवनिर्मितीचा स्तर, तर तिसरा स्तर या विद्येच्या व्यावहारिक उपयोजनाचा ठरतो. विविध विध्याशाखेच्या विकासाचा आलेख पाहता या त्रिस्तरीय रचनेचे संतुलन राखणारे विषय संशोधन आणि विकासाचे नवनवीन टप्पे गाठणारे ठरले आहेत. मुलभूत संरचना (Basic Structure) संशोधन व विकास (Research & Development) उपयोजन (Application) या त्रिमितीय सूत्रावर आधारित वाटचाल करणारे विषय आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःचे अस्तित्व ठामपणे टिकवू शकले आहेत. किंबहुना बदलत्या काळात अनेक क्षेत्रांची ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येत नाही. मग या बाबतीत भाषा अध्यापनाचे क्षेत्र कसे अपवाद ठरेल ? |