फुले-आंबेडकरी प्रेरणेने लेखन करणाया आजच्या नव्या दमाच्या लेखकांमध्ये अरूण मिरजकरांचे नाव ठळकपणे समोर येते. त्यांनी ‘फिरकी’ या आत्मकथनात्मक कादंबरीपासून लेखनाला आरंभ केला असला तरी त्यांनी कथा, कविता आणि नाटक या वाङ्मय प्रकारामधून लेखन केले आहे. समकालीन वास्तवाचे भान ठेवून लेखन करणाया नाटककारामध्ये त्यांची गणना केली जाते. फुले-आंबेडकरी विचारधारा केंद्रस्थानी ठेवून त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या पहिल्याच ‘फिरकी’ या कादंबरीमधून आंबेडकरी विचारामधील शिक्षणाचे महत्व, आपल्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करणे, स्त्री प्रतिष्ठा यासारख्या पैलूंचे दर्शन घडते. त्यांनी, ‘दि पिलर ऑफ सोशल डेमॉक्रसी’, ‘जोती म्हणे’, ‘निब्बाण’, ‘केसं’, ‘डॉलर’, ‘ब्लॅक नाईटस’ इत्यादी नाटकांचे लेखन करून ही सर्व नाटके रंगभूमीवर आणली आहेत. त्यांच्या या नाट¬लेखनामधून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या बरोबरच माणुसकी ही मूल्ये अधोरेखित होत आहेत. अरूण मिरजकर समकालीन प्रश्नांना भिडताना मानवमुक्तीचा विचार घेऊन समाजातील वाईट, अन्यायी प्रवृत्तीचा दंभस्फोट करताना दिसतात. तसेच ते आपल्या साहित्य कृतीमधून जागतिक प्रश्नांची मांडणी करून समाजाचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे अरूण मिरजकरांच्या साहित्यात फुले-आंबेडकरी जाणिवा प्रभावीपणे प्रकट होताना दिसतात. |